ताज्या बातम्या
ब्रेकींग न्यूज .....सांगोल्यात 63.31 टक्के मतदान; 4 टक्क्यांनी वाढ //

Slider

आपले सांगोला

आपले सोलापुर

Policediary

पोलीस डायरी

आपला जिल्हा

अवती भोवती

दोन टँकरचे प्रस्ताव -तिप्पेहळ्ळी, वाड्यावस्त्यांना टँकरचे पाणी

दोन टँकरचे प्रस्ताव
सांगोला तालुका: तिप्पेहळ्ळी, वाड्यावस्त्यांना टँकरचे पाणी
सांगोला : सांगोला तालुक्यात दिवसेंदिवस उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्यामुळे ग्रामीण भागात टँकरद्वारे वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठा करण्याचे प्रस्ताव ग्रामपंचायतीकडून तहसील व पंचायत समिती कार्यालयाकडे येऊ लागले आहेत. तालुक्यातील गळवेवाडी व कडलास या दोन गावांचे टँकर मागणीचे प्रस्ताव प्राप्त झाले असून, तिप्पेहळ्ळी गावांतर्गत वाड्यावस्त्यांना १ टँकर मंजूर झाल्याचे गटविकास अधिकारी राहुल गावडे यांनी सांगितले.
तालुक्यात १0३ गावांतर्गत ७३१ वाड्यावस्त्यांना ११३ ते ९५ टँकरद्वारे गतवर्षी दैनंदिन पाणीपुरवठा सुरु होता. टँकरद्वारे जनावरांच्या छावण्यांनाही अविरत पाणीपुरवठा सुरु असल्याने शिरभावी योजनेवर गतवर्षी प्रचंड ताण येत होता. चालू वर्षी गावोगावची पाण्याची स्थिती सुधारल्यामुळे या गावांतर्गत वाड्यावस्त्यांवरील टँकरचा भार कमी झाला आहे. सध्या तालुक्यातील जुनोनी अंतर्गत बळवंत मळा, सातकेवस्ती व कोळेंतर्गत कोंबडवाडी या गावाखालील वाड्यावस्त्यांना ३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे तर मंगळवारी तिप्पेहळ्ळी गावांतर्गत वाड्यावस्त्यांवरील पाणी टंचाई दूर करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी टँकर मागणीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्या ठिकाणी तत्काळ टँकर सुरु केला जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. दरम्यान मंगळवारी गळवेवाडी व कडलास ग्रामपंचायतीने वाड्यावस्त्यांवर पाणीटंचाई जाणवू लागल्यामुळे २ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु करावा, अशा मागणीचे प्रस्ताव तहसील व पंचायत समिती कार्यालयाकडे पाठवून दिले आहेत. गटविकास अधिकारी संबंधित गावांना भेटी देऊन पाणी टंचाईची पाहणी करणार असून, पाणीटंचाईच्या अहवालानंतर संबंधित गावांच्या टँकर मागणीची पूर्तता केली जाणार आहे.
तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत चालू वर्षी ऐन उन्हाळ्यात गाव, वाड्यावस्त्यांवरील हातपंपाची स्थिती समाधानकारक असल्यामुळे सध्या तरी वाड्यावस्त्यांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत नाही. शिवाय आजही २0 ते २२ गावांतील स्थानिक पाणीपुरवठय़ाच्या योजना कार्यान्वित असल्यामुळे शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतून या गावांचा पाणीपुरवठय़ाचा ताण कमी झाला आहे. सध्या शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतून ५९ गावांना पाणीपुरवठा सुरु आहे. 

सांगोल्यात तिकिटांचा तुटवडा

सांगोल्यात तिकिटांचा तुटवडा
सांगोला : सांगोला तहसील कार्यालयातील उपकोषागार कार्यालयामध्ये पाच रूपयांच्या कोर्ट फी तिकिटांचा तुटवडा निर्माण झाला असून लोकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
पाच रूपयांच्या तिकिटांचा तोटा असल्याने नागरिकांना नाईलाजाने दहा रूपयांचे तिकीट वापरावे लागत असल्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. दाखले काढण्या- साठीच्या अर्जावर, अर्ज करण्यासाठी पाच रुपयांच्या तिकिटाचा वापर केला जातो. 

लक्ष्मीदहिवडीतून ना. शिंदेंना मताधिक्य मिळण्याबाबत साशंकता

लक्ष्मीदहिवडीतून ना. शिंदेंना मताधिक्य मिळण्याबाबत साशंकता
लक्ष्मीदहिवडी / प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्याच्या पश्‍चिम भागात सध्या मतदानानंतर अनेक तर्क-वितर्क, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यात पैजा लागल्याचे पहावयास मिळत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी व भाजप यांच्याकडून आपापल्या उमेदवाराला दहिवडी गणातून मताधिक्य मिळेल, असे सांगण्यात येत असले तरी यावेळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या लक्ष्मीदहिवडी गणातून ना. सुशिलकुमार शिंदे यांना मताधिक्य मिळेल काय? याबाबत साशंकताच आहे.

या लोकसभेला सगळीकडेच मोदींची लाट सुरू असल्याचे बोलले जात असले तरी अनेक मतदार हे स्थानिक उमेदवारांकडे पाहूनही मतदान करतात. विद्यमान खासदार ना. सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी प्रचाराला ही वेळ कमी मिळाल्याने काही गावात त्यांनी दौरा केला नाही. तसेच या गणात अशी काही गावे आहेत की त्या गावातील मतदारांनी ना. शिंदेना प्रत्यक्षात पाहिले ही नाही. फक्त टीव्हीवर पाहूनच हे आपले उमेदवार आहेत. म्हणून आतापर्यंत हाताच्या चिन्हाला मतदान करणार्‍या मतदारानेही जे खासदार आतापर्यंत आपल्या गावातच आले नाहीत, आपल्या गावाला एक रूपयाचा फंडही दिलेला नाही. मग का मत टाकायचं? म्हणूनही अनेक मतदारांनी कमळाला जवळ केल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

तर काही गावात गटबाजी, नेत्यांचे हेवेदावे, श्रेय कुणी घ्यायचे या वादात भाजपचा फायदा होण्याची शक्यता आहे. सदैव राष्ट्रवादीच्या पाठीशी राहिलेल्या लक्ष्मीदहिवडी गावात तर मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादीकडून कोणी 'पोलिंग एजंट' ही न झाल्याने लोकांची नाराजी तालुकास्तरीय नेत्यांना उघडपणे दिसून आली आहे. सध्या लक्ष्मीदहिवडी गट राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. या गणाचे पं.स. सदस्य संजय पवार व गटाचे जि.प. सदस्य शिवाजीराव नागणे यांनी काँग्रेसला मताधिक्य देण्यासाठी दिवसरात्र एक केल्याचे दिसून आले. लक्ष्मीदहिवडी गणात राष्ट्रवादी पक्षाची पाच मोठी पदे आहेत. त्यामुळे या गणातून मताधिक्य मिळणारच असे जरी नेते म्हणत असले तरी मतदारांनी कॉंग्रेसला 'हात' केला आहे की कमळाला जवळ केले आहे? हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

सोलापूरच्या निकालावरुन मंगळवेढय़ात पैजा

मंगळवेढय़ात पैजा
सोलापूरच्या निकालावरुन
मंगळवेढा / तालुका प्रतिनिधी
सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी १७ एप्रिल रोजी मतदान झाले. मतदान झाल्यापासून कोण विजयी होणार याबद्दल भाजपा, शिवसेना, रिपाई, स्वाभिमानी शेतकरी संघटना व काँग्रेस-राष्ट्रवादी-रिपाई (कवाडे गट) यांच्यात पैजा लागल्या आहेत.

ना. सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव होवूच शकत नाही, यामुळे ना. शिंदेंच्या विजयाबद्दल अधिक खात्री आहे म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी त्या दिवशी धडाधड पैजा लावल्या. तर बिनपाण्याच्या या मतदार संघात कमळाचे फुल उमलणार नाही या भितीपोटी महायुतीच्या नेते, कार्यकर्त्यांनी दबकत, दबकत बोलण्यास सुरुवात केली. आता मतदार संघातून सर्वबाजूचे चित्र व अंदाज आल्यामुळे महायुतीच्या सर्मथकांनी उचल खाल्ली असून आता कमळ व हातामध्ये कमळाच्या बाजूने संख्या वाढू लागली आहे. त्या प्रमाणे पैजा व शर्यती देखील जोरात लागल्या पैज लावली आहे. ही पैज एक रुपयापासून अकरा हजार रुपयापर्यंत लावण्याचा प्रय▪झाला. निश्‍चित आकडा होत नसल्यामुळे शाब्दीक वादावादी वाढली अखेर एक दिवसाचा गल्ला देण्याची शर्यत लागली. परंतू दोन पैकी मोठय़ा व्यापार्‍याने आपला गल्ला मोठा असल्यामुळे दिवसभराच्या गल्ल्याच्या शर्यतीतून माघार घेतली. अखेर १६ मे रोजी सोलापूरला जाऊन मतमोजणी केंद्रात हजर राहणे, हात जिंकल्यास कमळाच्या फुलाच्या बाजूच्याने जेवण देणे, कमळ जिंकल्यास हाताच्या बाजूला असणाराने जेवण देण्याची शर्यत लागली. या दोन व्यापार्‍यांमध्ये आणखी दोघेजण सहभागी झाले आहेत. एकूणात गल्ल्यावरची शर्यत आता सोलापूरच्या ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये जेवणावळीवर आली आहे. शर्यत जेवण असो की गल्ला असो, ज्वर मात्र निवडणुकीच्या निकालाचा आहे. दोन्हीही बाजूने कमळाचे फुल उमलणार असल्याचा दावा मात्र जोरदारपणे केला जात आहे. ना. शिंदेंबद्दल थोड्याफार मताधिक्याने का होईना त्यांचा विजय होईल, असा आशावाद त्यांच्या सर्मथकांतून व्यक्त केला जात आहे.

पंढरीत दीड किलो बनावट सोने जप्त

पंढरीत दीड किलो
बनावट सोने जप्त
पंढरपूर / प्रतिनिधी
आटणीचे सोने स्वस्तात देण्याचा बहाणा करून फसवून बनावट सोन्याची विक्री करणार्‍या दोघांना मंगळवारी दुपारी आढीव परिसरात पोलिसांनी सापळा रचून दोघांना पकडले. या दोघा आरोपींकडून सुमारे दीड किलो वजनाचे बनावट सोने व गाडी जप्त करण्यात आली आहे. याबाबत पंढरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

परीट समाजाचा पुणे येथे वधुवर परिचय मेळावा

परीट समाजाचा पुणे येथे वधुवर परिचय मेळावा
सांगोला (प्रतिनिधी) - परीट समाजातील वधूवर व पालकांचा परिचय मेळावा 20 एप्रिल 2014 रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.
परीट समाजातील वधूवर व पालकांचा परिचय मेळावा दरवर्षी पुणे येथील संयोजकांच्यावतीने घेण्यात येतो. यावर्षीचा मेळावा 20 एप्रिल 2014 रोजी सकाळी 9 वाजता हॉटेल सेंट्रल पार्क, जंगली महाराज रोड, डेक्कन जिमखाना पुणे येथे होणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटन पुण्याच्या महापौर चंचलाताई कोद्रे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे उद्योजक रमाकांत कदम व माजी उपमहापौर सुरेश नाशिककर, उद्योजक प्रताप पवार, राष्ट्रीय उपाध्यक्ष तुकाराम दळवी, नगरसेवक निलेश लोणकर, नगरसेवक सचिन पाचुंदे, प्रदेशाध्यक्ष एकनाथ बोरसे, जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब साळुंखे आदी उपस्थित राहणार आहेत. वधुवर नोंदणीसाठी पासपोर्ट साईज फोटो, पत्रिका व संपूर्ण बायोडाटा व नोंदणी फी घेवून यावे असे आवाहन नारायण पवार, धनाजी चन्ने, सुधाकर यादव, अशोक राऊत तसेच अध्यक्ष कृष्णा खंडाळे, कार्याध्यक्ष राजाभाऊ कदम, सरचिटणीस बंडोबा राऊत, खजिनदार सतिश शिंदे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सोलापूर जिल्हा प्रचारप्रमुख राजेंद्र यादव (9423969644) यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

सांगोल्यात 63.31 टक्के मतदान; 4 टक्क्यांनी वाढ

सांगोल्यात 63.31 टक्के मतदान; 4 टक्क्यांनी वाढ
सांगोला दि. 17 (सा.वा.) - सांगोला विधानसभा मतदारसंघात लोकसभेसाठी आज 63.31 टक्के इतके मतदान नोंदविण्यात आले. 2009 सालापेक्षा 4 टक्क्यांनी मतदानात वाढ झाल्याचे दिसून आले. मतदान शांततेत पार पडले असले तरी आचारसंहिता भंगाचे 3 गुन्हे दाखल झाल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी दिली.
सांगोला विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 65 हजार 325 मतदार आहेत. त्यापैकी 1 लाख 67 हजार 985 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात पुरुष मतदारांची संख्या 91 हजार 388 इतकी आहे तर महिला मतदारांची संख्या 76 हजार 597 इतकी आहे. मतदानाची ही टक्केवारी 63.31 टक्के इतकी झाली आहे. प्रचाराची वेळ संपल्यानंतरही प्रचार केल्याने आर.पी.ऍक्ट 130 अन्वये शहरात दोन तर तालुक्यातील घेरडी येथे एक असे एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आल्याचेही क्षीरसागर यांनी सांगितले. मतदानादरम्यान जवळा येथे मशिनमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात येताच मतदानापूर्वीच मशिन बदलण्यात आली. तर कडलास येथे दोन मतदान झाल्यानंतर बिघडलेली मशिन बदलण्यात आली. उर्वरित सर्व ठिकाणी मतदान शांततेत व कसलाही व्यत्यय न येता पार पडल्याचे श्रावण क्षीरसागर यांनी संागितले.